दुसऱ्या लग्नासाठी गरोदर पत्नीला मारहाण

Foto

गर्भपातासाठी दबाव आणणाऱ्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणत विवाहितेला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत, तिच्यावर तीन महिन्यांचा गर्भ पाडण्यासाठी दबाव आणल्याची घटना नारेगावातील पटेलनगर भागात उघडकीस आली. गर्भपातास नकार दिल्याने संतप्त पतीने गरोदर पत्नीच्या पोटात लाथ मारून तिला खाली पाडले. ही घटना २१ मे रोजी दुपारी घडली.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
पती फरदीन रज्जाक शेख (२१), सासू शेख रुबीना (४०), सासरा शेख रज्जाक (सर्व रा. पटेलनगर, नारेगाव) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात २१ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली.
लग्नानंतर काही दिवसांपासून पती शिवीगाळ करून मारहाण करत होता. दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगून घरातून निघून जाण्याचा दबावही तो टाकत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. २१ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पुन्हा वाद झाला. तीन महिन्यांच्या गर्भवतीला पतीने गर्भपात करण्यास सांगितले. मात्र पीडितेने गर्भपातास नकार दिल्यानंतर संतप्त पतीने शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली.
वडिलांच्या नाकावर मारला दगड
▶ वादानंतर पीडितेने आई-वडिलांना बोलावून घेतले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता सासू रुबीना शेख व सासरा रज्जाक शेख यांनीही शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पीडितेच्या वडिलांच्या नाकावर दगड मारून जखमी केले. जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अरविंद मेने तपास करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions